समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) 377 कलमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी सुनावला आहे. 377 कलमाला अवैध ठरवत समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

समलैंगिता हा गुन्हा नाही, लोकांनी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. समलैंगिक लोकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं आज एकमतानं म्हटलं आहे. मी जसा आहे तसा आहे. त्यामुळे आहे तशा रुपातच स्वीकार केला पाहिजे, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. रोहिंटन नरीमन, न्या. एएम खानविलकर, न्या. डी वाई चंद्रचूड आणि न्या. इंदु मल्होत्रा या पाच न्यायाधिशांच्या घटनात्मक खंडपीठाने हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आयपीसीच्या कलम 377 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या  याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी पूर्ण झाली होती. सुनवणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

सहमतीने समलैंगिकता स्वीकारून तसं जगण्यास गुन्हा ठरवणारं कलम 377 वर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेतीखाली पाच सदस्यांच्या घटनापीठाने 10 जुलै रोजी सुनावणी सुरू केली होती. चार दिवसांच्या सुनावणी नंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

दरम्यान, या ऐतिहासिक निकालानंतर समलैंगिकांनी जोरदार स्वागत केले आहे. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.

#WATCH Celebrations in Chennai after Supreme Court in a unanimous decision decriminalises #Section377 and legalises homosexuality pic.twitter.com/0dRCLDiBYy