जम्मू कश्मीरच्या हंदवाडात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

562

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. हंदवाडातील नौगाम सेक्टर येथील नियंत्रण रेषेहून घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला 5 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधी जम्मू कश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. त्यासाठी घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सुरक्षा दलाला गस्तीदरम्यान नौगाम सेक्टरजवळ नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सतर्क होत सुरक्षा दलाने कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याविरोधात सुरक्षा दलाने मोहिम सुरू केली. या कारवाईत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके 47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू कश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षा दल सतर्क असून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या