व्यावसायिकाची हत्या करणाऱया सुरक्षारक्षकाला अटक; हत्येनंतर पैसे वाटून घेतले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिक मनीषभाई पटेलच्या हत्येप्रकरणी पळून गेलेल्या सुरक्षारक्षकाला दहिसर पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेडय़ा ठोकल्या. राहुल रामनाथ शर्मा असे त्याचे नाव असून त्याचा दुसरा साथीदार हा फरार आहे. मनीषची हत्या केल्यावर राहुल आणि फरार आरोपीने घटनास्थळी पैसे वाटून घेतले होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी फरार आरोपीने मनीषच्या हत्येचा कट रचला होता.

मनीष हे गुजरातमधील औषध व्यावसायिक होते. ते दहिसर येथील एका सोसायटीत भाडय़ाने राहत होते. मनीष हे तीन दिवसांपासून फोन उचलत नसल्याने रविवारी घर मालक हे घरी आले. त्यानेदेखील घराचा दरवाजा ठोकला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मालकाने घर उघडले तेव्हा मनीष हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याची माहिती मालकाने दहिसर पोलिसांना दिली. त्यानंतर दहिसर पोलीस घटनास्थळी आले. फॉरेन्सिकच्या पथकाने तपासणी केल्यावर मनीषची हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले. मनीषच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ओम तोतावार यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या इमारत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा एका फुटेजमध्ये राहुल आणि फरार आरोपी हे जात असताना दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. मनीषची हत्या राहुलने केली असून तो बिहारला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक बिहारला गेले. तेथून पोलिसांनी राहुलला अटक केली. चौकशीत त्याने मनीषची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. तर मुख्य आरोपी हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दारू पाजून केली हत्या 

मनीष हे काही दिवसांपूर्वी हे एका हॉटेलमध्ये राहण्यास होते. हॉटेलमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणाया राहुलची त्याची ओळख झाली होती. ओळखीनंतर राहुल आणि फरार आरोपी हे तीनदा मनीषच्या दहिसर येथील घरी आले होते. मनीषकडे पैसे असतात हे फरार आरोपीला माहीत पडले. झटपट श्रीमंत होण्यासाठी फरार आरोपीने मनीषच्या हत्येचा कट रचला. त्या दोघांनी दहिसर येथील एका दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली. त्यानंतर ते दोघे घरी आले. मनीषला त्या दोघांनी दारू पाजली. दारूच्या नशेत असताना राहुल आणि फरार आरोपीने फुलदाणी मनीषच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली.

पिशवी ठरली महत्त्वाची 

पोलिसांना घटनास्थळी एक पिशवी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी इमारत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा दोन जण हे हातात पिशवी घेऊन येत असल्याचे दिसले. घटनास्थळी सापडलेली आणि सीसीटीव्हीत दिसणारी पिशवी एकच होती.