
टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावरील हांडे व्यापारी संकुलातील एचडीएफसी बँकेचे एटीएम सहा ते सात चोरटय़ांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएमच्या रखवालदाराने प्रसंगावधान राखून चोरटय़ांच्या स्कॉर्पिओवर दगडफेक करून आरडाओरडा केला. त्यामुळे चोरटय़ांनी जीपसह पळ काढल्याने लाखो रुपये वाचले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी शहरात करमाळा रस्त्यावरील हांडे व्यापारी संकुलात एचडीएफसी बँकेची शाखा असून, या शाखेत बँकेचे एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीनच्या रक्षणासाठी पंचरत्न लोंढे (वय 21, रा. माळेगाव, ता. माढा) हा रखवालदार रात्रपाळीत डय़ुटीवर होता. रविवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास शौचास गेला असता, करमाळा चौकातून एक पांढऱया रंगाची स्कार्पिओ जीप आली. त्यातून एक अनोळखी इसम उतरला. रखवालदार लोंढे याला ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले असावेत, असे वाटले.
मात्र, काही क्षणात त्यातील इतर साथीदारांनी एटीएम मशीनला वायर रोप बांधून ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे रखवालदार तेथे पळत आला व त्याने आरडाओरड करीत गाडीवर दगड मारण्यास सुरुवात केली. जीपने एटीएम मशीन दीडशे फूट ओढत नेले. पण, एटीएमला बांधलेला वायररोप अचानक तुटला. रखवालदाराने आरडाओरड केल्याने शेजारील लोक जागे झाल्याचे लक्षात येताच, चोरटे जीपमधून पळून गेले. यामुळे एटीएम मशीन व त्यातील रक्कम वाचली.
या घटनेची माहिती समजताच, रात्रगस्तीचे पोलीस तेथे आले. दरम्यान, बँकेच्या शाखाधिकाऱयांना कळविल्याने तेही घटनास्थळी आले. शाखाधिकारी सोमनाथ उंबरे यांनी एटीएमचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भीमराव गोळेकर तपास करीत आहेत.





























































