
आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगणाऱया 19 वर्षीय साहिल अहिरवार या तरुणाने ‘कौन बनेगा करोडपती’च्या 13 व्या सीजनमध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथे राहणाऱया साहिलने या सीजनमधला दुसरा करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. साहिल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील नोएडा येथे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना तो लेक्चर बुडवून मित्रांसोबत मौजमस्ती करण्यात, चित्रपट पाहण्यात वेळ घालवायचा, पण पुढच्या दोन वर्षांमध्ये त्याने निष्ठेने अभ्यास करून चांगले गुण मिळवले.
केबीसीमध्ये साहिलने सात कोटी रुपयांसाठी जॅकपॉट प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. पण खात्री न वाटल्याने त्याने माघार घेतली. त्यामुळे त्याला एक कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले.
आपला आनंद व्यक्त करताना साहिल म्हणाला, माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे. जिंकलेल्या पैशांतून मला आईसाठी एक घर घ्यायचे आहे, लहान भावासाठी क्रिकेट सेट घ्यायचा आहे तसेच आयएएस बनण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठी काही पैसे खर्च करायचे आहेत.





























































