पाण्याच्या टाकीत सापडला सुरक्षारक्षकाचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले येथील एका निवासी इमारतीच्या तळ मजल्यावरील पाण्याच्या टाकीत सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आला. मनोज कुमार यादव असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तपासासाठी सात पथके तयार करण्यात आली आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
विलेपार्ले पश्चिम येथे एक निवासी इमारत आहे.

 

त्या इमारतीत मनोज हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मनोज हा ड्युटीवर न आल्याने दुसऱ्या सुरक्षारक्षकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण इमारतीत शोध घेतला. तसेच मनुष्यबळ पुरवणाऱ्या एजन्सीशीदेखील संपर्क केला. मात्र काहीच माहिती मिळाली नाही. त्याचा शोध सुरू असताना इमारतीच्या तळ मजल्यावरील पाण्याच्या टाकीत मनोजचा मृतदेह मिळून आला. त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. याची माहिती जुहू पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मनोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मनोजचे हात बांधून त्याला टाकीत टाकण्यात आले. त्याचा गळा आवळण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.