पुरातत्व खात्याकडे मनुष्यबळाची वानवा; स्मारके 375, रक्षक अवघे 80!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, लेण्या असा समृद्ध ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र हा ठेवा जपायचा कसा? त्याचे दिवस-रात्र रक्षण, संवर्धन करायचे कसे? असा प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. राज्यभरातील ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी पुरातत्व खात्याकडे मनुष्यबळाचीच वानवा आहे. 375 स्मारकांच्या देखरेखीसाठी अवघे 80 वॉचमन असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यातील 375 ऐतिहासिक स्मारके ही महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात. या स्मारकांचे दिवसरात्र रक्षण करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. विभागाकडे सध्या केवळ 80 वॉचमन असून सेवानिवृत्तीचे प्रमाणही अधिक असल्यामुळे या संख्येलाही गळती लागणार आहे. प्रत्येक स्मारकाच्या रक्षणासाठी एक वॉचमन तैनात करणे गरजेचे आहे, असे पुरातत्व विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आठ तासांची डय़ुटी आणि चार तासांचा ओव्हरटाईम अशा पद्धतीने प्रत्येक वॉचमनकडून सेवा बजावली जाऊ शकते, परंतु आधीच मनुष्यबळ कमी असल्यामुळे सर्व स्मारकांवर लक्ष ठेवणे मुश्कील बनतेय, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

स्मारकांभोवती संरक्षक भिंत, एण्ट्री–एक्झिट गेट हवे!

निधी वाटपाच्या बाबतीत पुरातत्व विभाग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. राज्यातील सर्व स्मारकांच्या कायमस्वरूपी रक्षणासाठी या स्मारकांभोवती संरक्षक भिंत उभारली पाहिजे तसेच एण्ट्री-एक्झिट गेटची उभारणी केली पाहिजे अशी अपेक्षा राज्य किल्ले संवर्धन समितीचे सदस्य भगवान चिले यांनी व्यक्त केली.