हिंदुस्थानी वंशाच्या सीमा नंदा अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सीईओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थानी वंशाच्या सीमा नंदा यांनी अमेरिकेतील विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची ( सीईओ ) सूत्रे स्वीकारली आहेत. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन किंवा विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सीईओपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी वंशाच्या महिला आहेत. अमेरिकेला पुन्हा गौरवशाली लोकशाहीवादी आणि मानवी मूल्यांचे संरक्षण करणारा देश बनविण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाला सत्तेत आणण्याचा निर्धार नंदा यांनी व्यक्त केला आहे.

नंदा यांनी २३ जुलैला डेमोक्रेटिक पक्षाच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्या म्हणाल्या, आम्ही देशाचा आत्मा, आमची पवित्र लोकशाही आणि अमेरिकन नागरिकांना प्रगतीसाठी मिळणाऱ्या सुसंधींचे रक्षण करण्यासाठी लढणार आहोत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर बिघडलेली स्थिती सुधारून देशाची आर्थिक ,राजकीय आणि सामाजिक घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी आम्ही झटणार आहोत ,असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेची मुक्त लोकशाहीवादी आणि शोषित सामान्यांच्या हक्काला वाव देणारा देश ही प्रतिमा आम्हाला टिकवायची आहे ,असे सांगून नंदा म्हणाल्या ,सत्ताधारी पक्षाशी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. आमचा डेमोक्रेटिक पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास सकारात्मक राजकारण करून आम्ही देशाची घसरती गाडी पुन्हा रुळावर आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
नंदा यांना न्याय ,नागरी हक्क विभागाचा दाडंगा अनुभव आहे. सीमा नंदा यांचे आई-वडील डेंटिस्ट आहेत. नंदा यांचे बालपण कनेक्टिकट येथे गेले आहे. त्यांनी ब्राउन युनिव्हर्सिटी आणि बोस्टन कॉलेज लॉ स्कूलमधून आपले पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे.त्यांच्या नियुक्तीने एक आशियाई व्यक्ती प्रथमच अमेरिकेतील प्रबळ राजकीय पक्षाच्या प्रमुखपदी बसली आहे.