
खोट्या बातम्या पसरवण्याच्या बाबतीत पाकिस्तानच हात कोणीही धरु शकत नाही. खोटे पसरवण्याच्या नादात पाकडे अनेकदा तोंडावर आपटले आहेत. तरी त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पुन्हा एकदा जम्मू कश्मीरच्या नावाने गळा काढत खोटे पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. एक्सने त्यांच्या पोस्टचे फॅक्ट चेक करताच त्यांची पोलखोल झाली. २७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि कश्मीरबद्दल खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. शाहबाज यांनी हिंदुस्थानने आक्रमण केल्याचा आरोप करत कश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचा दावा केला आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला. मात्र, एक्सने फॅक्ट चेकमध्ये अशी कागदपत्रे दाखवली की त्यांची बोलतीच बंद झाली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने शाहबाज यांच्या पोस्टवर कठोर भूमिका घेत तथ्य तपासणी (फॅक्ट चेक) केले आणि पंतप्रधान शाहबाज यांच्या दाव्याला दिशाभूल करणारे वृत्त असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यानंतर, शाहबाज यांच्यावर एक्सवर जोरदार टीका केली जात आहे. २७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने पुन्हा एकदा कश्मीरचे रडगाणे सुरू केले. पाकिस्तान असे पसरवत आहे की ७८ वर्षांपूर्वी याच दिवशी हिंदुस्थानी सैन्याने श्रीनगरमध्ये आक्रमण करत ते ताब्यात घेतले. त्यामुळे पाकिस्तान दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी हाच राग आलापत जगासमोर रडगाणे गात आहे.
शाहबाज शरीफ यांनी अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी हिंदुस्थानने आक्रमण केल्याचा आरोप केला. तसेच कश्मीर पाकिस्तानचा भाग असून तिथे ‘मानवी हक्कांचे उल्लंघन’ होत आहे, असा आरोप केला. यावर एक्सने ताबडतोब तथ्य तपासणी जारी केली, शाहबाज यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले. एक्सने शरीफच्या पोस्टला उत्तर देत म्हटले, “ही दिशाभूल करणारी बातमी आहे. महाराजा हरी सिंह यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी हिंदुस्थानात सामील होण्यास सहमती दर्शविली. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हिंदुस्थानने २७ ऑक्टोबर १९४७ रोजी या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी श्रीनगरला सैन्य पाठवले. या कम्युनिटी नोट्समध्ये हिंदुस्थानच्या सरकारी रेडिओ सेवेच्या ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहातून एक ऐतिहासिक पत्र पोस्ट केले आहे. त्यात महाराजा हरी सिंह यांनी जम्मू आणि कश्मीरचे हिंदुस्थानात विलीनीकरण करण्यास सहमती दर्शविली आहे. हे मे २०२५ मध्ये लागू झालेल्या माहितीसाठी X च्या नवीन तथ्य-तपासणी धोरणाचे परिणाम आहे. तेव्हापासून, पाकिस्तानी राजकारण्यांनी केलेल्या अनेक खोट्या दाव्यांवर नोट्स लावण्यात आल्या आहेत.
महाराजा हरी सिंह यांच्या विलीनीकरणाच्या कागदपत्राव्यतिरिक्त, X ने इतर अनेक ऐतिहासिक कागदपत्रांच्या लिंक्स देखील शेअर केल्या आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की महाराजा हरि सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचे हिंदुस्थानात विलीनीकरण केल्यानंतरच हिंदुस्थानने काश्मिरींचे रक्षण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये आपले सैन्य पाठवले होते.
१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी, जम्मू आणि कश्मीर हे एक स्वतंत्र संस्थान होते. त्याला स्वतंत्र राहण्याचा किंवा भारत/पाकिस्तानात सामील होण्याचा पर्याय देण्यात आला होता. महाराजा हरि सिंह हे जम्मू आणि काश्मीरचे शासक होते. सुरुवातीला ते स्वतंत्र राहू इच्छित होते. तथापि, २२ ऑक्टोबर १९४७ रोजी, पाकिस्तान समर्थित आदिवासी सैन्याने (पश्तून जमाती आणि पाकिस्तानी सैन्यातील घुसखोर) मुझफ्फराबाद आणि डोमेल मार्गे श्रीनगरकडे हल्ला केला.पाकिस्तान आदिवासी हल्ल्यांच्या आडून जम्मू आणि काश्मीर काबीज करू इच्छित होते. २६ ऑक्टोबरपर्यंत या लढवय्यांनी उरी आणि बारामुल्ला ताब्यात घेतले, श्रीनगर फक्त ५० किमी अंतरावर होते. महाराजा हरी सिंह यांचे सैन्य पाकिस्तानींशी लढत होते, परंतु शस्त्रास्त्रे आणि संख्येने कमकुवत होते.
बारामुल्लामध्ये लूटमार, हत्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येऊ लागल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. महाराजा हरी सिंह यांनी व्ही.पी. मेनन (भारतीय गृहमंत्रालयाचे सचिव) यांची मदत मागितली. हिंदुस्थानने सांगितले की जर जम्मू आणि कश्मीरचे रियासत कायदेशीररित्या हिंदुस्थानात विलीन झाले तरच सैन्य पाठवले जाईल. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी महाराजा हरी सिंह यांनी विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली, त्यामुळे जम्मू आणि कश्मीर कायदेशीररित्या हिंदुस्थानचा भाग झाला. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी भारतीय लष्कराची तुकडी (1 शीख रेजिमेंट) श्रीनगर विमानतळावर उतरली. ब्रिगेडियर जे.सी. कटोच यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने ताबडतोब बारामुल्लाकडे वाटचाल केली, घुसखोरांना रोखले आणि त्यांना परत हाकलून लावले. ही हिंदुस्थानची पहिली यशस्वी हवाई लष्करी कारवाई होती.
इतिहासात एवढे स्पष्ट असतानाही दरवर्षी पाकिस्तान गळा काढत खोटे पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडावर आपटतो. यंदा पाकिस्तानी पंतप्रधानाच खोटे पसरवण्याच्या नादात तोंडावर आपटले आहेत.

























































