हिंगोलीत पोलीस ठाण्यातील जप्त ‘दारू’वर चोरट्यांचा डल्ला

947

हिंगोली शहरामध्ये ‘पोलीस ठाणे’च असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान जप्त करून हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवलेल्या 74 हजार रुपयांच्या देशी व विदेशी दारूवर चक्क चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबतीत गोपनीयता बाळगली असल्याचेही समोर आले आहे.

हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून योगेशकुमार हे आयपीएस अधिकारी आहेत.तर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड कार्यरत आहेत. अकोला ते नांदेड या रस्त्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये पोलीस अंमलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक , मुद्देमाल, गोपनीय शाखा असे विविध कक्ष असून आरोपींना ठेवायची पोलीस कोठडीही आहे. त्याच्या बाजूला हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याची इमारत आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्ह्यात जप्त केलेली देशी व विदेशी दारू मुद्देमाल कक्षात ठेवली होती. 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी सहा ते 18 ऑक्टोबरच्या सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मुद्देमाल कक्षाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आणि वाकवून मुद्देमाल कक्षात प्रवेश केला. त्यानंतर मुद्देमाल कक्षातील साठ हजार रुपये किंमतीचे 26 देशी दारूचे बॉक्स, 14 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या 180 एमएलच्या 64 बाटल्या चोरून नेल्याची तक्रार पोलीस जमादार सखाराम मोहनराव थेटे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर करत आहेत.

डीवायएसपीना माहिती नाही
हिंगोली शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांना या घटनेबाबत माहिती विचारण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी पोलीस निरीक्षकांनी माहिती दिली नसल्याचे सांगितले. तसेच अशी काही घटना घडली असल्या त्याबाबत माहित नाही, माहिती समजल्यावर आपल्याला सांगतो असे उत्तर दिले. तर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना पोलीस ठाण्यातून देशी व विदेशी दारू चोरीला गेल्याच्या घटनेला दुजोरा दिला. चोरीला गेलेली दारू जप्त केल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल केला का ? या प्रश्नावर बघू असे उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या