ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ‘टीम इंडिया’ची निवड येत्या शुक्रवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ हिंदुस्थानच्या दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यावर दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘टीम इंडिया’चा उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता असून बर्‍याच दिवसांपासून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 15 फेब्रुवारीला टीम इंडियाची निवड करण्यात येईल.

कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेकडे संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा येऊ शकते. रहाणे गतवर्षी फेबुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. याचबरोबर एका टीव्हीवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे निलंबित झालेला लोकेश राहुल यालाही पुन्हा एकदा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 24 फेबुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थान दौर्‍याला प्रारंभ होणार आहे.  

बुमराह पुनरागमन करणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होणार आहे. न्यूझीलंड दौर्‍यावर त्याला विश्रांती देण्यात आली होती. ‘टीम इंडिया’ नोव्हेंबरपासून सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने ‘बीसीसीआय’ने काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. यावेळी मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्रांती दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षिय मालिकेत महेंद्रसिंग धोनीचे खेळणे निश्चित मानले जात असून दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. नव्या दमाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याच्याही नावाची संघनिवड समितीला दखल घ्यावी लागणार आहे.