दिल्लीच्या आश्रमात 17 मुलींचा लैंगिक छळ; स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी चैतन्यानंदला आग्र्यातून अटक

दिल्लीतील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला अटक करण्यात आली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होतात. आता दिल्ली पोलिसांनी त्याला आग्र्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

चैतन्यानंद हा दिल्लीच्या वसंत कुंज येथील दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग ऍण्ड मॅनेजमेंटचा माजी संचालक आहे. लोकांमध्ये त्याने स्वतःची प्रतिमा अध्यात्मिक गुरू अशी निर्माण केली होती. गेल्या 16 वर्षांपासून तो महिलांचा छळ करायचा. तब्बल 50 मुलींच्या मोबाईलवर चैतन्यानंदने केलेले अश्लील मेसेज आढळले आहेत. कधी आमिष दाखवून तर कधी धमक्या देऊन तो तरुणींचा लैंगिक छळ करायचा.

2009 आणि 2016 साली त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली होती. मात्र कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढले होते. चैतन्यानंदच्या या कृत्यांमध्ये आश्रमातील तीन महिला वॉर्डनचा सहभाग होता, असा पोलिसांचा संशय आहे. संस्थेतील 32 विद्यार्थिनी व महिलांनी बाबाविरोधात तक्रार केली होती. त्यापैकी 17 जणींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. प्रकरण उघडकीस आल्यापासून चैतन्यानंद फरार होता. दिल्ली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

दिल्ली पोलिसांचे पथक आग्रा आणि आसपासच्या भागात बाबा चैतन्यानंदचा शोध घेत होती. रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास आग्रा येथील एका हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी बाबा चैतन्यानंद याला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

दरम्यान, बाबा चैतन्यानंद याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत दिल्लीतील एका न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र शुक्रवारी न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी अटक करून चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हणत जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी बाबा चैतन्यानंद याला अटक केली.