वेल्डिंग वर्कशॉपमध्ये नशेच्या इंजेक्शनची विक्री, मालकाला अटक

अलिबाग तालुक्याच्या आक्षीसाखर या गावातील वेल्डिंगच्या वर्कशॉपमध्ये नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या वर्कशॉपवर छापा मारून मालकाला अटक केली. तसेच नशेच्या इंजेक्शनचा साठादेखील जप्त केला आहे.

आक्षी साखर येथील सुरज राणे याने आपल्या वेल्डिंग वर्कशॉपमधून मेपेंटरमीन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री सुरू केली होती. पोलिसांनी सापळा रचून 10 मिली क्षमतेच्या मेपेंटरमीन सल्फेट इंजेक्शनच्या 10 बाटल्या, लाल टोपण असलेले 4 पांढऱ्या रंगाचे इंजेक्शन जप्त केले.

या इंजेक्शनचा वापर जिममध्ये जाणारे तरुण तसेच साहसी खेळ करणारे खेळाडू करीत होते. रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.