
परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरातील कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने राज मोहल्ला हा भाग प्रशासनाने सील केला आहे. परंतु शहरातील जुना भाग असलेल्या भागातील गल्लोगल्लीतील रस्त्यावर काटे, दगड टाकून आज रस्ते बंद केल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत आहे.
शहरातील जुन्या भागात अनेक गल्ल्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांना दूध आणण्यासाठी जावे लागते. या भागात अनेक शेतकरी असल्याने त्यांची जनावरे शेतात आहेत. त्यांना चारा पाणी करण्यासाठी तसेच शेतीचे कामे करण्यासाठी बाहेर पडावे लागते. तसेच जर या भागात कुणी रुग्णाला दवाखान्यात जायचे असल्यास तो कसा जाणार? असाही प्रश्न निर्माण होत आहे. वृद्ध नागरिकांना देखील दवाखान्यात कसे नेणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तसेच या भागात दररोज नगर परिषदेच्या घंटा गाड्या कचरा नेण्यासाठी येतात. आता रस्तेच बंद केल्याने घंटा गाड्याही येऊ शकणार नाहीत. मग नागरिकांनी कचरा कुठे टाकावा? असाही प्रश्न निर्माण होत आहे. कचरा बाहेर टाकल्याने एरवी स्वच्छतेची सवय लागलेली असतांना पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरू शकते. नगर पालिकेने गल्लीच्या मुख्य तोंडाला बांबूच्या साहाय्याने रस्ते बंद केले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी काही रस्ते मोकळे देखील ठेवले होते. पण अशा प्रकारे गल्लोगल्ली अनधिकृतपणे रस्ते बंद करून काय साध्य होणार? यामुळे प्रशासनानेच तातडीने जुन्या भागातील काही रस्ते तरी किमान मुख्य रस्त्याला मिळणारे काही रस्ते तरी मोकळे करावेत अशी मागणी होत आहे.


























































