‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झुपकेदार मिशा, आवाजातील जरब आणि आपल्या वैशिष्टय़पूर्ण अभिनयाने गावरान सरपंच, ‘वस्ताद पाटलां’पासून ते न्यायाधीशांपर्यंतची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (84) यांचे शनिवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

छातीत दुखू लागल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रवी पटवर्धन यांच्यामागे पत्नी नीता, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. रविवारी दुपारी निवडक चाहत्यांच्या उपस्थितीत पटवर्धन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

– दीडशे नाटके, दोनशे चित्रपट

वयाच्या सातव्या वर्षापासून पटवर्धन यांनी मराठी रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते रंगभूमीशी एकनिष्ठ राहिले. छोटा पडदा असो की मोठा रंगभूमीवरचा सेट असो की कोणताही जाहीर कार्यक्रम, पटवर्धन यांची रसिकांवर वेगळीच छाप पडायची. दीडशेहून अधिक नाटके तसेच दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणस’ं या कार्यक्रमात देखील त्यांनी स्वतŠचे वेगळेपण दाखवले. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेमुळे रवी पटवर्धन हे पुन्हा घराघरांत पोहोचले होते.

82 व्या वर्षी साकारला ‘आरण्यक’ धृतराष्ट्र

वयाच्या सातव्या वर्षापासून रवी पटवर्धन यांनी मराठी रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते या रंगभूमीशी एकनिष्ठ राहिले. छोटा पडदा असो की मोठा रंगभूमीवरचा सेट असो, की कोणताही जाहीर कार्यक्रम, पटवर्धन यांनी रसिकांवर वेगळीच छाप पाडली. दीडशेहून अधिक नाटके तसेच दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. रिझर्व्ह बँकेतील नोकरी सांभाळून त्यांनी रंगभूमीची आवड जोपासली. 1944 साली नाटय़ महोत्सवातील बालनाटय़ात त्यांनी काम केले होते. बालगंधर्व त्या नाटय़ महोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. तिथून रवी पटवर्धन यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला, तो अलीकडच्या ‘आरण्यक’ नाटकापर्यंत सुरू राहिला. ‘आरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर केले आणि वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांनी या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका साकारली. आपल्या वैशिष्टय़पूर्ण आवाजाचा परिणामकारक वापर करत धृतराष्ट्राच्या अस्तित्वाचा संघर्ष अक्षरशः जिवंत केला. माणसाने सतत शिकत राहिलं पाहिजे, असं रवी पटवर्धन म्हणायचे. त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी ‘भगवद्गीते’चे 700 श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत पटवर्धन पहिले आले होते. त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिपून घेतले होते. या विषयावरचे भरपूर साहित्य अभ्यासले. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधीग्रस्तांनाही पटवर्धन यांनी या उपचार पद्धतीचा खूप फायदा करून दिला.

 बीबीसीने घेतली दखल

एकेकाळी घराघरात पोहोचलेल्या मराठी दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसं’ या शेतीविषयक कार्यक्रमाची दखल बीबीसीने देखील घेतली होती. त्यांच्या कार्याचा राज्य सरकारने दोनच वर्षांपूर्वी विशेष पुरस्कार देऊन सत्कार केला होता.

भारदस्त अभिनेत्याला मुकलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱया ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाही तर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठय़ा भूमिकांत अक्षरशŠ प्राण ओतला. असे सिने-नाटय़सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र्ा कलाकार आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.