
मराठी तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. ते 75 वर्षांचे होते. ‘निवडुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसा बाप तशी पोर’ , ‘ईश्वर’, ‘नरसिम्हा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी वास्तव, सरफरोश अशा सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.
सुनील शेंडे हे चक्कर येऊन त्यांच्या राहत्या घरी पडले त्यामुळे त्यांच्या शरीरांतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. रात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.























































