
समाजवादी चळवळीतील अग्रगण्य नेते, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव आणि उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांचे शनिवारी मध्यरात्री 12.20 वाजता नांदेडमधील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंड व इतर त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर नारायण रुग्णालयात उपचार चालू होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचे निधन झाले.
सदाशिव पाटील मूळचे खानदेशातील मुक्ताईनगर, जळगाव जिल्ह्यातील होते. व्यवसायानिमित्ताने नांदेडमध्ये स्थायिक होत त्यांनी कर सल्लागार म्हणून काम सुरू केले. लहानपणापासून त्यांच्यावर सानेगुरुजी यांचा प्रभाव असल्यामुळे ते समाजवादी विचारधारेशी जोडले गेले होते. ते शेवटपर्यंत समाजवादी पक्ष व परिवारात काम करीत होते. त्यांनी साधी राहणी अंगिकारली होती. त्यांनी विविध संघटनेत काम केले. मराडवाडा जनता विकास परिषदेचे शहर अध्यक्ष तसेच ते राष्ट्रसेवादलाचे विश्वस्त होते. त्यांनी पी. सदाशिव पाटील अॅण्ड कंपनी भाग्यनगर येथे स्थापन केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाताई पाटील, एक मुलगा, दोन मुली,नातू असा परिवार आहे. पाटील यांच्या पार्थिवावार रविवारी सकाळी 11 वाजता शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





























































