
शिवसेना भवन येथील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन सोहळा येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सायंकाळी 6 वाजता होईल.
ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष स्थापनेचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ज्येष्ठ रणरागिणी महिलादेखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 15 ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 800 हून अधिक जणांना सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी स्वरमैफिल निर्मित ‘शिवस्वर संध्या’ हा मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होईल. ‘शिवस्वर संध्या’ची संकल्पना, दिग्दर्शन, परेश दाभोळकर यांचे आहे.
शिवसेना भवन येथे 2022 साली ‘ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष’ची स्थापना झाली. शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक ज्येष्ठ शिवसैनिक याच्याशी जोडलेले आहेत. अध्यक्ष चंद्रकांत कोपडे, आप्पा चव्हाण, श्याम नायडू, वासू चव्हाण, दिनानाथ सावंत, राजन चांदोरकर असे वयाची सत्तरी-ऐंशी गाठलेले अनेक ज्येष्ठ आजही शिवसेनेचे काम निष्ठेने आणि ऊर्जेने करत आहेत. शाखाशाखांमध्ये मार्गदर्शन करत आहेत. ‘जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक तिखट’ असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याला जागून त्यांचे कार्य सुरू आहे.




























































