
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत ऊर्फ दादा महामिने (87) यांचे आज रविवारी सकाळी अकरा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
चंद्रकांत महामिने हे ज्येष्ठ विनोदी साहित्यिक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. विनोदी साहित्याबरोबरच ललित, नाटय़ आणि कथांबरोबरच बाल कथासंग्रह असे विपुल लेखन त्यांनी केले. त्यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक दिवसाचा मुख्यमंत्री, गंगू आली रे अंगणी, प्रवराकाठची माणसं, इंद्रलोकी मधुचंद्र, गावरान ठसका, सखेसोबती, दुसरा मधुचंद्र, मदनबाधा अशी त्यांची अनेक पुस्तके गाजली. बाल कथासंग्रह, विनोदी एकांकिका आणि नाटय़लेखनही त्यांनी केले आहे. खानावळ ते लिहिणावळ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. राज्य शासकीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, केशव वाङ्मय पुरस्कार, वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक, गिरिजा कीर कथा पुरस्कार, खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

























































