
गेला काही काळ सतत कोसळणाऱ्या सेन्सेक्स सोमवारी मात्र चांगलाच वधारला आहे. शुक्रवारी शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांनी सेन्सेक्सने उसळी मारली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 613.66ने वधारला. तर दुसरीकडे निफ्टीही 185.6ने वधारून 11.387वर सुरू झाला.
सोमवारी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांवर सेन्सेक्सने उसळी घेतली आणि तो 636.54 अंकांनी वधारत 39.933.83 इतका वाढला. तसंच निफ्टीतही वाढ होऊन 185.95 अंकांची वाढ झाली. सुरुवातीच्या काही मिनिटातच सेन्सेक्स तब्बल 750 अंकांनी वधारला. यात आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, टायटन, ओएनजीसी यांच्या समभागांचा मुख्यत्वे समावेश आहे. यांच्या समभागांमध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तुलनेने टेक महिंद्रा आणि कोटक बँक यांचे शेअर वधारलेले नाहीत.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे सुमारे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला. 47 देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील ‘कोरोना’चे मोठे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर पडत आहेत. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1448 अंकांनी कोसळला. ही पडझड कमी झाली नाही. सर्वच क्षेत्रांतील शेअर्सची प्रचंड विक्री झाली. एकाच दिवसात तब्बल 1448 अंकांनी सेन्सेक्स कोसळण्याची 24 ऑगस्ट 2015 नंतरची ही पहिलीच वेळ होती. सेन्सेक्स 38,296 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीचा अंक 431 अंकांनी कोसळून 11,201 वर बंद झाला.
ऑटो, बँका, तेल, वायू, फार्मा, मेटल, एनर्जी अशा सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांचा सेन्सेक्स घसरल्याने गुंतवणूकदारांना सुमारे 6 लाख कोटींचा फटका एका दिवसात बसला. मागील सहा सत्रांत मिळून गुंतवणूकदारांनी तब्बल 10 लाख कोटी रुपये गमावले आहेत.
जगभरात पडझड
जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शांघाई, हाँगकाँग, सेऊल टोकियो शेअर बाजारात 3.71 टक्क्यांनी शेअर्स घसरले. z युरोपात 4 टक्क्यांनी पडझड झाली. डाऊजोन्सचे शेअर्स तब्बल 1190 अंकांनी घसरला आहे.





























































