
38 वर्षीय अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला विक्रमी 24व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाचे वेध लागले आहेत. प्रेग्नन्सी, दुखापत यांसारख्या कारणांमुळे तिला 2017 सालानंतर एकही ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाच्या बरोबरीपासूनही तिला दूर राहावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता 23 ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्स 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ओपन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत 24व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र विक्रमी जेतेपदाच्या मार्गात तिच्या समोर अव्वल खेळाडूंचा अडथळा असणार आहे. यावेळी सेरेना विल्यम्स या खेळाडूंचा सामना कसा करतेय याकडे तमाम टेनिसप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.
अमेरिकन ओपन स्पर्धेसाठीचा ड्रॉ गुरुवारी जाहीर करण्यात आला. यानुसार सेरेना विल्यम्ससमोर तिसऱया फेरीत 2017 सालातील अमेरिकन ओपन चॅम्पियन स्लोअन स्टीफन्सचे आव्हान असणार आहे. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिला मेडिसन किजचा सामना करावा लागणार आहे. तसेच उपांत्य फेरीत तिला सोफिया केनिन व अंतिम फेरीत कॅरोलिना फ्लिस्कोवा या खेळाडूंना लढत द्यावी लागणार आहे. एकूणच काय, तर सेरेना विल्यम्सचा जेतेपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोप्पा नसणार आहे.
जोकोविच – थिम पुन्हा भिडण्याची शक्यता
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला नोवाक जोकोविच 18व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. त्यामुळे त्याला रॉजर फेडरर व रफाएल नदाल यांच्या नजीक पोहोचता येणार आहे. 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ओपन स्पर्धेमधून रॉजर फेडरर व रफाएल नदाल या दिग्गजांनी माघार घेतली असली तरी युवा स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे नोवाक जोकोविचलाही खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या स्पर्धेच्या ड्रॉवर नजर टाकल्यास नोवाक जोकोविचला उपांत्य फेरीत ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव आणि अंतिम फेरीत डॉमिनिक थिमचा सामना करावा लागू शकतो.























































