
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील तब्बल १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या अखेर नवी मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा देण्यास नकार देत अधिक तपशील दिला नाही. दरम्यान आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतरच त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलींना फूस लावून हा नराधम निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात धुमाकूळ घातल्यानंतर या माथेफिरूने गेल्या १५ दिवसांपासून वसई, नालासोपाऱ्यात उच्छाद मांडत दोन मुलींवर अत्याचार केले होते. त्यामुळे पालक चांगलेच धास्तावले आहेत. मात्र तपासासाठी पथके नेमूनही आरोपी सापडत नसल्याने अखेर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लाऊन सावधानतेचे आवाहन केले होते. अखेर आज नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीवरून या नराधमाला बेड्या ठोकल्याची चर्चा आहे. आरोपीची सखोल चौकशी सुरू असल्याने पोलीस याबाबत अधिकृत दुजोरा देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
























































