
सांताक्रुझमध्ये उबेर कंपनीच्या रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर मुलीचे पालक उबेर कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यास गेले होते. त्यादरम्यान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पालकांसोबत उन्माद व मुजोर भाषा वापरली. तसेच चालकाच्या कृत्याबाबत हात झटकले. त्यामुळे उबेरची कार्यपद्धती वादात सापडली आहे.
बारावीच्या परीक्षेला चाललेल्या विद्यार्थिनीचा भररस्त्यात उबेर कंपनीच्या रिक्षाचालकाने विनयभंग केला. मुलीच्या पालकांनी उबेर कंपनीच्या कुर्ला येथील रजिस्टर्ड ऑफिसला भेट दिली. कंपनीने भविष्यातील घटना टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे पत्र देण्यासाठी पालकांनी उबेर कंपनीचे कार्यालय गाठले होते. मात्र तेथील सुरक्षा रक्षकांनी कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला. नंतर इथे कोणतेही पत्रव्यवहार घेतले जात नाहीत, परदेशी कंपनी असल्याने सर्व व्यवहार ई-मेलद्वारे करावेत, असे उत्तर देण्यात आले. उबेर ऍपवरून तक्रार नोंदवून 48 तास उलटल्यानंतरही कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या पालकांसोबत सुरक्षा रक्षकांनी मुजोर भाषेचा वापर केला. ‘तुम्ही मुलीचा उपयोग करून कंपनीला त्रास देत आहात’ अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांत सुरक्षा रक्षकाने उत्तर दिले. कंपनीच्या कायदे सल्लागारांनीही जबाबदारी झटकली.
रिक्षाचालक कोठडीत
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणारा रिक्षाचालक श्रीरामकुमार साव याला वाकोला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सांताक्रुझच्या गोळीबार रोड परिसरात ही घटना घडली. मुलीने महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा प्रवासादरम्यान सावने मुलीचा विनयभंग आणि पाठलाग केला. मुलीने घरी पोहचल्यावर संपूर्ण घटनेची माहिती पालकांना दिली. त्यानंतर पालकांसोबत ती वाकोला पोलीस ठाण्यात गेली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून सावला अटक केली. सुरुवातीला त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत संपल्यावर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.





























































