
सामना प्रतिनिधी । नगर
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गुरुवारी अडथळे आले. विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे कॉलेजमधील सेतू सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान 20 व 21 जून हे दोन दिवस विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया बंद ठेवण्याचा निरोप सेतू केंद्राचे जिल्हा समन्वयक यांच्याकडून कॉलेजमधील केंद्रांना दिल्याचे समजते.
इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर अशा प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नगर शहरातील काही कॉलेजांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी सकाळी दहानंतर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्वच सेतू सुविधा केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया राबवताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे हाल होत आहेत. वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी करणे व कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत आपल्या कागदपत्रांची पडताळणी होणार का, या चिंतेतच विद्यार्थी व पालक दिसत होते. अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सेतू सुविधा केंद्रांना पत्र पाठवण्यात आले असून, प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे; तसेच या प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक लवकरच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन इच्छिणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.





























































