नाशिक जिल्ह्यातील सातही धरणे ओव्हरफ्लो

440

सामना ऑनलाईन, नाशिक / इगतपुरी

इगतपुरीसह आदिवासीबहुल तालुक्यात सलग दोन आठवडे धुंवाधार बरसलेल्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली. धरणांतील विसर्ग कमी केल्याने पूरही ओसरला. मात्र, इगतपुरीत भातशेतीचे मोठे नुकसान झाले. तब्बल चार दिवसांनंतर अस्वली, शेणीतचे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, इगतपुरी, नाशिक, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सिन्नर, सटाणा या तालुक्यांनी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली, तर आळंदीसह सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

नाशिक शहरात आजपर्यंत सरासरीच्या 158 टक्के पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला 138, दिंडोरी- 125, इगतपुरी- 114, सुरगाणा- 116, सिन्नर- 110, सटाण्यात 100 अशी आतापर्यंतची पावसाची टक्केवारी आहे. सर्वात कमी 39 टक्के पाऊस नांदगावला झाला. देवळा- 45, कळवण- 56, चांदवड- 60, मालेगाव- 83, निफाड- 85, येवला- 82 टक्के असे तालुकानिहाय पर्जन्यमान आहे. दरम्यान, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ येथे आज रिमझिम ते मध्यम सरी बरसत होत्या. इतरत्र तुरळक पाऊस झाला.

म्हैसवन घाट बंदच

इगतपुरी तालुक्यातील टाकेद भागातील म्हैसवन घाटातील वाहतूक रस्ता खचल्याने अजूनही बंदच आहे. तालुक्यात आज पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे तब्बल चार दिवसांनी दारणा नदीवरील अस्वली व शेणीतच्या पुलावरील पाणी ओसरले. मात्र, सर्वत्र गाळाचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुलांच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. तालुक्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी आहे.

धरणसाठा 78 टक्के

जिह्यातील 24 धरणांमधील जलसाठा 51 हजार 284 दशलक्ष घनफूट (78 टक्के) झाला आहे. आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे 100 टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणात 89 टक्के जलसाठा झाला असून, यातून 2450 क्यूसेक्स पाणी सोडले आहे. काश्यपी 97 टक्के, गौतमी-गोदावरी 95 टक्के भरले असून, अनुक्रमे 844 व 417 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. पालखेड 70, करंजवण 93, दारणा 88, कडवा 86, चणकापूर 60, पुनद 69 टक्के भरले आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून 56,672 क्यूसेक्सचा विसर्ग करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या