वन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सात जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । येवला

वन विभागाच्या येवला तालुक्यातील ममदापूर वनक्षेत्रामधील सोनार नाल्यातील वाळूचोरी प्रकरणात रविवारी रात्री काही वाळूमाफियांनी वन विभाग कर्मचाऱयांवरील केलेल्या मारहाण व प्राणघातक हल्लाप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल होताना येवला तालुका पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे.

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात वन विभागाचे विस्तीर्ण असे वन क्षेत्र असून पूर्व भागातील वन क्षेत्रात काही ठिकाणी नैसर्गिक नदी-नाल्यांचे स्रोत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे ममदापूर वन क्षेत्र परिसरात येणारा सोनार नाला. याच नाल्यावर रविवारी रात्री अवैधपणे वाळूउपसा करण्यास आलेल्या काही अज्ञात वाळूमाफिया अन् वन विभाग कर्मचाऱयांमध्ये वन कर्मचाऱयांनी वाळू उचलण्यास प्रतिबंध केल्याने शाब्दिक चकमक उडताना वाळूउचलेगिरी करणाऱयांनी वन कर्मचाऱयांवर दगडफेक करत मारहाण व प्राणघातक हल्ला
केला होता.

तालुका पोलीस ठाण्याचे एका पोलीस अधिकाऱ्यासह पथक भादलीत थडकताना अटकेची ही कार्यवाही केली गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या सर्वांना उद्या शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उद्या पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सांगितले.

याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यामध्ये वन कर्मचाऱयांच्या फिर्यादीवरून दीपक बाबासाहेब ठाकरे (19), सोमनाथ कारभारी ठाकरे (29), बाबासाहेब भाऊसाहेब चव्हाण (20), गणेश दादाभाऊ ठाकरे (21), गणेश आण्णासाहेब सोनवणे (27), दीपक सीताराम ठाकरे (28) व संदीप रावसाहेब चव्हाण (18, सर्व राहणार भादली, तालुका वैजापूर (जिल्हा-संभाजीनगर) अशा एकूण सात संशयित आरोपींना मंगळवारी  सायंकाळी अटक केली आहे.