
वारंवार नोटीस बजावूनही राजरोसपणे सुरू असलेल्या सात बेकायदा शाळांवर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ठाणे प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना नुकतीच अंबरनाथमधील शाळांची यादी पाठवली असून, त्यात या सात बेकायदा शाळांची माहिती दिली आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदा शिक्षणसंस्थांचे धाबे दणाणले आहे.
शासकीय सूचना व शिक्षण विभागाच्या उल्लंघन करणाऱ्या सात शाळांना पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी डॉ. विशाल पोतेकर यांनी वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तरीही या शाळा बेधडकपणे सुरू असल्याने शिक्षण विभागाने त्या शाळांना बेकायदेशीर घोषित करत संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात कुळगाव-बदलापूरमधील अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री चैतन्य टेक्नो, वांगणीतील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, अडिवली भाल येथील तिसरी विद्यालय प्राथमिक शाळा, तिसरी विद्यालय माध्यमिक शाळा, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्राथामिक शाळा व श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विद्याल य या सात शाळांचा समावेश आहे.
पालकांना आवाहन
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने पालकांनी शाळेत प्रवेश घेताना सावधगिरी बाळगत संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे गट शिक्षण अधिकारी डॉ. विशाल पोतेकर यांनी सांगितले.
शिक्षणाच्या नावाखाली दुकाने थाटली
गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ व बदलापूरमध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. आम्ही मोठे शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत आहोत, असा अविर्भाव आणून काही कथित संस्था शाळांच्या नावाखाली अक्षरशः दुकाने थाटत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाने आता अशा शाळांवर वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



























































