
मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध माध्यमांच्या 28 शाळा गेल्या तीन वर्षांत बंद पडल्या असून यात तब्बल 17 मराठी शाळांचा समावेश आहे. असे असताना आताही प्रशासनाकडून कारस्थान करून मराठी शाळा बंद पाडण्याचे काम सुरू आहे. याविरोधात मराठी अभ्यास पेंद्राच्या वतीने उद्या 10.30 वाजता पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारकापासून हा मोर्चा पालिकेवर धडकणार आहे.
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मराठी अभ्यास पेंद्राच्या वतीने 14 डिसेंबर रोजी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह येथे ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ घेण्यात आली. यामध्ये मराठी शाळांच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पालिकेच्या मराठी शाळा जबरदस्तीने बंद पाडणं आणि जागा बळकावणं एवढय़ाच माफक अर्थाचे हे प्रकरण नसून, मुंबईतील खासगी अनुदानित, विनाअनुदानित मराठी शाळांच्या जमिनींवरही हे बुलडोझरराज भविष्यात येणार आहे. या धोरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.





























































