खुशखबर! पालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना ऑक्टोबरपासून सातवा वेतन आयोग

465

मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी खुशखबर आहे. या शिक्षकांना पुढील महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरच्या पगारापासून सातवा वेतन आयोग तसेच त्याची थकबाकी देण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱयांनाही हा आयोग लागू करण्यात आला आहे, मात्र पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील माध्यमिक शाळांमधील 1450 शिक्षक सातवा वेतन आयोगापासून वंचित होते. या शिक्षकांनाही हा आयोग त्वरित लागू करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत लावून धरली.

पालिका कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधा पालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येतात परंतु माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पालिकेच्या कर्मचारी विभागाने नकारात्मक अहवाल दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यावर माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी शिक्षण विभागाला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या