नगर तालुक्यावर दुष्काळाचे तीव्र सावट; पाणीटंचाईने फळपिके धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले, तर नगर तालुक्यात पावसाने पाठच फिरवली होती. तालुक्यातील बोटावर मोजता येणारी गावे सोडली, तर बहुतांश गावांत समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. आता मार्च सुरू झाला असून, विहिरींनी तळ गाठला आहे, तर पाणीटंचाईने फळपिके धोक्यात आली आहेत.

सध्या नगर तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळाचे सावट असून, विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळ्यात अनेक नद्या वाहत्या झाल्याच नाहीत, त्यामुळे लहान-मोठय़ा तलावांत पाणीसाठा झालाच नाही. तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. डोंगर उतारावर वसलेल्या अनेक गावांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे.

पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झालीच नाही. त्याचा परिणाम होऊन सध्या रब्बी पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवला आहे. पाण्याअभावी कांद्याची वाताहत झाली. उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली. कांद्याच्या क्षेत्राची जागा ज्वारी, हरभरा, चारा पिकांनी घेतली. साधारणपणे मार्च अखेरीस पाण्याचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात होणाऱया गावांना फेब्रुवारीच्या शेवटीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे.

थंडीसह अवकाळी पावसाने जिरायत पट्टय़ातील ज्वारीचे पीक जोमदार आले होते. परंतु, रानडुकरांच्या उपद्रवाने ज्वारीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेले बंधारे, तलाव दुरुस्ती, नद्यांचे खोलीकरण यामुळे पाण्याच्या समस्येवर मात करण्यात चांगले यश आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. परंतु, चालू वर्षी बंधारे, तलाव, विहिरी कोरडय़ाठाक पडल्या आहेत. पिंपळगाव माळवी तलावातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. डोंगरदऱ्या हिरवाईने नटलेल्या असतात. वन्य प्राणी, पशुपक्षी स्वच्छंदपणे बागडताना दिसतात. परंतु, पावसाअभावी सर्व चित्र पालटले आहे.

उन्हाळ्यात इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, मदडगाव, मांडवे, भोईर पठार, दशमी गव्हाण, भोईरे खुर्द, नारायण डोहो, माथणी, बाळेवाडी, उक्कडगाव, कोल्हेवाडी या गावांमध्ये कायमच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. भूजल पातळी झपाटय़ाने खालावत चालली असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे संकट आणखी गडद होणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने विकतच्या टँकरने पाणी घालून फळबागा सध्या शेतकरी जगवत आहे. परंतु, हे जास्त काळ शक्य होणार नाही. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने फळबागांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

सोलापुरात चाऱयाअभावी शेतकऱयांची स्थिती बिकट

जिल्ह्यात यंदा ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱयाची मागणी जास्त असल्याने चाऱयाच्या किमती महाग झाल्या आहेत. दुभती जनावरे जगविण्यासाठी तत्काळ चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.

जिह्यात जनावरांच्या बाजारात गाय, म्हैस यांसह शेळ्या-मेंढय़ा कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱयांना एक लाखाला घेतलेली गाय चाऱयाअभावी आता 60-70 हजारांना विकावी लागत आहे. जरी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात असली तरी त्यांना कोणी खरेदी करीत नसल्याने व्यापारी मागेल त्या भावात विकावे लागत आहे. माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जिवांची होरपळ होत असून, पाणी, चाऱयाअभावी पशुपालक शेतकऱयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यंदा शेतकऱयांना दुबार हंगाम घेता न आल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱयाच्या भाववाढीने पशुपालक मेटाकुटीला आला आहे.