संगोपनाच्या नावाखाली शिवडी ऐतिहासिक किल्ला खासगी संस्थेच्या घशात

मुंबईच्या जडणघडणीचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला शिवडीचा किल्ला संगोपनाच्या नावाखाली खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा निर्णय महायुती सरकारने आज घेतला आहे. हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता दहा वर्षांसाठी खासगी संस्थेच्या ताब्यात देण्यात आला आहे.

राज्यात महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य संरक्षित स्मारके दहा वर्षांसाठी देण्यात येतात. त्यानुसार या योजनेअंतर्गत शिवडी किल्ला मुंबईतील आरपीजी फाऊंडेशनला दहा वर्षांच्या कालावधीसाठी संगोपनासाठी देण्यात आला आहे. या संस्थेकडून महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 नुसार किल्ल्याचे संगोपन केले जात आहे की नाही याबाबत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक दर तीन वर्षांनी आढावा घेतील. त्यानंतर संस्थेचा कालावधी वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

पालकत्व कालावधीत स्मारकाचे छायाचित्रण, चित्रीकरण करण्याचा, त्याचा उपयोग दिनदर्शिका, डायरी अशा प्रकाशनांमध्ये करता येईल. तसेच स्मारक ठिकाणी पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क, वाहन शुल्क आकारणी, प्रकाश-ध्वनी योजना, साहसी खेळांची व्यवस्था, निवास-उपाहारगृह व्यवस्था, दुर्मिळ दस्तावेजांचे प्रदर्शन, कार्यक्रम आयोजित करता येतील.