दौंडमध्ये शिक्षकाकडून आठ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, फरार शिक्षकाला सासवडमधून अटक

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ क्लीप दाखवून शिक्षकानेच सात ते आठ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कदायक घटना मळद गावात घडली. गुन्हा उघडकीस येताच आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी सासवडमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बापूराव धुमाळ असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयात हा संतापजनक प्रकार घडला आहे. आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना फोन करायचा. त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. मुलींनी विरोध केला तर हेच व्हिडिओ त्यांना दाखवून धमकावायचा. आरोपीच्या धमक्यांना कंटाळून अखेर एका मुलीने 15 ऑगस्ट रोजी पालकांना याबाबत सांगितले.

घटनेबाबत कळताच मुलीचे पालक आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापकांना प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी संचालक मंडळाशी याबाबत चर्चा करण्याचे सांगून वारंवार याप्रकरणी कारवाई टाळली. अखेर गावकऱ्यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर कारवाईला टाळाटाळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली.

गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला सासवड येथून अटक केली आहे. शाळेत घडलेल्या या प्रकारानंतर संचालक मंडळाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.