
एका अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन नराधमांना मुंबईतील विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने आज 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. विकी चिंडलिया, सुनील शाम चिंडलिया आणि दीपक चिंडलिया अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी कांदिवली येथील एका चाळीत राहणारे असून या नराधमांच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेला हा मुलगा या चाळीच्या मागे असलेल्या इमारतीत राहतो.
10 डिसेंबर 2013 रोजी हा मुलगा टय़ूशनवरून घरी परतत होता. त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा भाऊदेखील होता. हा मुलगा इमारतीजवळ येताच विकी चिंडलिया याने त्याला जबरदस्तीने शेजारीच असलेल्या महापालिकेच्या उद्यानात नेले. तसेच उद्यानातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक संभोग केला. विकीपाठोपाठ सुनील आणि दीपक यांनीही या मुलाचे लैंगिक शोषण केले.
शाळेत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलाचा या नराधमांनी लैंगिक छळ केल्याने त्याच्या बालमनावर मोठा आघात झाला आहे. त्याच्यावर गुदरलेल्या हा भयानक प्रसंग समाजात त्याची प्रचंड मानहानी करणारा तसेच त्याच्या भावभावनेवर विपरीत परिणाम करणारा आहे. या घटनेनंतर आजपर्यंत त्याने सोसलेल्या आंतरिक त्रासाची कोणत्याही प्रकारे भरपाई होऊ शकत नाही. परंतु त्याच्या या दुःखावर फुंकर घालून किमान त्याला समाजात मोकळेपणाने वावरता यावे यासाठी सरकारने त्याचा सरकारी योजनेतून नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश विशेष न्यायाधीश ए. डी. देव यांनी दिले.
























































