
सामना प्रतिनिधी, पणजी
रणजी स्पर्धेत गोव्यासाठी भरीव कामगिरी करून देखील संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आल्याने नाराज झालेल्या रणजीपटू शदाब जकातीने गोवा क्रिकेट असोसिएशनवर आरोपाचा बाउन्सर टाकतानाच अझरुद्दीनच्या मुलाला गोव्याच्या संघात स्थान दिल्या बद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचा माजी कर्णधार अझरुद्दीनचा मुलगा असदुद्दीन मोहम्मद आणि अमित वर्मा यांची गोव्याच्या रणजी संघात वर्णी लावून गोवा क्रिकेट असोसिएशनने गोव्यातील 2 क्रिकेटपटूंचे रणजी खेळण्याचे स्वप्न भंगले असल्याचा आरोप शदाबने काल पत्रकार परिषद घेऊन केला.
शदाबने गोव्याच्या वतीने 20 वर्षे रणजी खेळून 92 सामन्यांमधून 272 बळी घेतले आहेत. 9 वर्षे शदाबने आयपीएलमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली आहे.आपली कामगिरी समाधानकारक असताना देखील जीसीएने रणजी संघातून वगळून आपल्यावर अन्याय केला असून याबाबत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शदाबने दिला. शदाबने जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर आणि संघाचे प्रशिक्षक प्रकाश मयेकर यांच्या कार्यक्षमतेवर देखील जोरदार टिका केली.
दरम्यान, जीसीएचे सचिव दया पागी यांनी शदाबचे आरोप फेटाळून लावत शदाबची कामगिरी समाधानकारक नसल्यानेच त्याला वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पागी यांनी असाऊद्दीन आणि अमित यांच्या निवडीचे समर्थन केले आहे. दोघे प्रोफेशनल क्रिकेटपटू असून गोव्याचे पाहुणे असल्याचे पागी यांचे म्हणणे आहे. असदुद्दीनचे वडील तथा टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे गोव्याच्या संघासाठी कोणताही मोबदला न घेता मेंटर म्हणून काम करणार असून गोव्याच्या क्रिकेटपटूंना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असा दावा पागी यांनी केला आहे.
summary- shadab jakati slams selection of asduddin mohammad

























































