शाहरूख खान पुन्हा लग्न करतोय; म्हणाला, लवकरच पत्रिका मिळेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर निक जोन्स यांच्या लग्नाचा विषय सर्वत्र चवीने चघळला जात आहे. यामध्ये किती तथ्य आहे याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. निक आणि प्रियांका यांचा गुपचुप साखरपुडाही झाल्याची चर्चा असून अद्याप दोघांनीही यावर चकार शब्द बाहेर काढलेला नाही. प्रियांकाच्या वाढदिवशी दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चाही सुरू आहे. याच संदर्भात शाहरूख खान याला विचारण्यात आले तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

निक आणि प्रियांकाच्या लग्नाबाबत शाहरूखला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ‘मी देखील लग्न करणार असून लवकरच तुम्हाला पत्रिका पाठवणार आहे. माझी पत्रिका तुम्हाला रिसेप्शनला मिळेल आणि हा मेहेंदीला नक्की या.’ शाहरूखच्या या उत्तराने सर्वच चकीत झाले असून तो पुन्हा लग्न करणार की काय अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान, त्याने असे उत्तर का दिले याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनेही निक-प्रियांकाच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. या दोघांचे लग्न होणार असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. मी या लग्नात जाण्यासाठी उत्सुक आहे. प्रियांका एक चांगली मुलगी असून जगातील सगळ्या आनंदावर तिचा हक्क आहे, असे कंगना म्हणाली.