
मुंबई-नाशिक महामार्गावर चालकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा शहापूर पोलिसांनी ‘धूर’ काढला आहे. आठ जणांच्या टोळक्याने चालकांना धमकावत लागोपाठ दोन मोबाईल चोरले. क्राईम दुचाकीवरून धूम ठोकत असताना भरधाव गाडीने चोरट्यांना धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की यात एका चोरट्याचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. यातील दोन अल्पवयीन चोरट्यांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव हद्दीत थांबलेल्या टेम्पोचालकाचा दुचाकीवरून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने दमदाटी करून मोबाईल चोरला. त्यानंतर टोळक्यांनी नाशिक दिशेने दोन किमी अंतरावर जाऊन चेरपोलीजवळ ट्रकचालकाला अडवून त्याचाही मोबाईल व ट्रकची चावी खेचली. यादरम्यान टोळक्यांच्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत गौतम फुलवाणी याचा जागीच मृत्यू झाला, तर निखिल अडनानी हा जखमी झाला.
असे सापडले
टेम्पोचालकाने ११२ नंबरवर कॉल करून तक्रार दिली. अपघात झाला त्याच ठिकाणी हा चालकही होता. त्याने आरोपींना ओळखले आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मात्र नील सिंग, विशाल पवार, काळू व हृदय मूलचंदाणी हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.