
शहरातील नामांकित दमानी शाळेतील शौचालयामध्ये रक्त दिसले म्हणून मुलींची कपडे उतरवून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समजताच संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत प्राचार्यांना जाब विचारला. तसेच ठिय्या आंदोलन करीत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी व्यवस्थापन व हे कृत्य करणाऱ्या शिक्षकांविरोधात पालकांनी घोषणा दिल्या. या घटनेप्रकरणी महिला प्राचार्यास अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थिनी धास्तावल्या असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शहापुरातील अर्चना एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आर. एस. दमानी स्कूल चालवण्यात येते. मंगळवारी शाळेच्या आवारातील चाल यामध्ये रक्ताचे डाग दिसून आले. ते नेमके कोणत्या मुलीचे आहेत याबाबत प्राचार्या माधुरी गायकवाड यांनी विचारणा केली. त्यानंतर शाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सहावी ते दहावीतील सुमारे सवाशे विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले
या गंभीर प्रकारानंतर घाबरलेल्या मुलींनी आपल्या पालकांना अक्षरशः रडत संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळेवर धडक देत प्राचार्यांना जाब विचारला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना समजताच त्यांनीही शाळेत जाऊन प्राचार्यांना धारेवर धरले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख विजय देशमुख, बाळा निमसे, गणेश अवसरे, मिलिंद देशमुख यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेऊन प्राचार्या माधुरी गायकवाड यांच्यासह शिक्षिका प्रज्ञा, नेहा, प्रिया, स्नेहा, संस्थाचालक इंदिरा पतोडिया, लक्ष्मी देवरा, महिला कर्मचारी नंदा यांच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.