शहापूरकरांच्या हक्काच्या लसींवर उपऱ्यांचा डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महाराष्ट्र दिनाच्या मुहर्तावर शनिवार पासून 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण सुरु केले आहे. (सर्व फोटो- रुपेश जाधव)

शहापूर तालुक्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी शेंद्रुन आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालय,शहापूर येथे लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.केंद्रावर लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी व स्लॉट बुक करणे अनिवार्य आहे.मात्र शहापूरकरांच्या या हक्काच्या लसींवर उपऱ्यांनीच डल्ला मारला आहे.त्यात शहापूर तालुक्यात अनेक भाग दुर्गम आहेत.त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यानेच अडचणीत भर पडल्याचा आरोप सर्वसामान्यांनी केला आहे.

राज्यात असलेल्या लसीच्या तुटवड्यामुलळे शहापूर तालुक्यात सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे.18 वर्षांवरील वयोगटातील तरूणांना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट बुक करणे अनिवार्य आहे.मात्र शहापूर तालुक्यातील हक्काच्या लसींवर मुंबई,वसई-विरार ठाणे या शहरी भागातील नागरिकांनी डल्ला मारल्याने स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे.कोविन ॲपवर सध्या स्लॉट बुक करताना कॅप्चा कोड टाकताना अनेकांची भंबेरी उडते.बहुसंख्य वेळा कॅप्चा कोड टाकूनही चुकीचा दाखवला जातो.कधी कधी टाईप केलेला कोड दिसतच नाही.त्यात दोनशे ते तीनशे लसींसाठी संपूर्ण जिल्हा व जिल्ह्याबाहेरील लोक प्रयत्न करत असल्याने 15 ते 30 सेकंदामध्ये स्लॉट बुक होत आहेत.त्यामुळे अनेकांच्या पदरी निऱाशा पडत आहे.

किचकट ऑप्शन बंद करा!

कोविन ॲपमधील अनेक त्रुटींमुळे लसीकरणाची नोंदणी करताना अडचणी येत आहेत.प्रामुख्याने स्लॉट बुक करताना कॅप्चा कोड टाईप करण्यातच बराचसा वेळ निघून जात असल्यामुळे प्रशासनाने हा किचकट ऑप्शन बंद करून नागरिकांना स्लॉट बुक करणे सोपे कसे होईल,याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.