कोरोनामुळे कुस्तीच चीतपट, पैलवान शैलेश शेळकेने व्यक्त केली नाराजी

452

कोरोना व लॉकडाऊनमुळे कुस्ती हा खेळच चीतपट झाला आहे. मार्च महिन्यापासून हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मार्च ते मे या कालावधीत होणाऱया बहुतांशी स्थानिक कुस्त्या, हिंदकेसरी, कुस्ती प्रीमियर लीग या सर्व रद्द करण्यात आल्या. कुस्ती या खेळामध्ये बहुतांशी पैलवान हे सर्व सामान्य कुटुंबातील असतात. कुस्त्या न झाल्यामुळे हंगाम वाया गेला. या कारणामुळे गरीब व होतकरू कुस्तीपटूंचे मोठे नुकसान झाले. अशी खंत मराठमोळा पैलवान शैलेश शेळके याने दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.

काळय़ा मातीमध्ये कुस्तीचा सराव केला
लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद होते. जिम, तालीम बंद असल्यामुळे मला आमच्या शेतामध्येच कुस्तीचा सराव करावा लागला. शेतातील काळ्या मातीमध्ये मी कुस्तीचा सराव केला. मी काका पवार यांच्या तालीमीत या खेळाचे बारकावे आत्मसात करीत आहे. गावी मला मॅटकरील कुस्तीचा सराव करायला मिळालेला नाही. पण 20 जुलैनंतर मी पुन्हा काका पवार यांच्या तालीमीत जाईन तेव्हा फिटनेससह सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देईन, असे शैलेश शेळके आवर्जून म्हणाला.

दोन आठकडे लागतील रुळावर यायला
कोरोना व लॉकडाऊनमुळे जवळपास चार महिने घरीच आहे. त्यामुळे जेव्हा सरावाला सुरुवात करीन तेव्हा सर्व काही रुळावर येण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागतील. फिटनेस मिळवण्यासाठी थोडा अवधी लागेल. मी 97 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतो. आतापर्यंत दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्वही केले आहे, असे हा पठ्ठय़ा पुढे सांगतो.

सोयाबीन, ऊसाची शेती
मी आई-वडील व दोन भावांसह जिल्हा लातूर, मुक्काम पोस्ट टाका येथे वास्तव्य करतो. एक भाऊ माझ्यासोबत कुस्तीचा सराव करतो. दुसरा भाऊ बी. फार्मचे शिक्षण घेतोय. वडिलांचे मन शेतामध्ये रमते. सोयाबीन व उसाची शेती आम्ही करतो, असे शैलेश शेळके यावेळी म्हणाला.

नियमांसह सराव सुरू करायला हरकत नाही
कुस्ती हा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या खेळाचा सराव सुरू व्हायला थोडा उशीर लागेल. पण युरोप खंडात फुटबॉल या खेळाच्या स्पर्धेला सुरूवात झालीय. कुस्ती या खेळाच्या सरावाआधी काही नियम बनवल्यास याही खेळाची टप्प्याटप्प्याने सुरू वात होऊ शकते. स्पर्धांना सुरू झाल्यानंतर सीनियर राष्ट्रीय कुस्ती, ऑलिम्पिक पात्रता फेरी यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे, असे शैलेश शेळके यावेळी विश्वासाने म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या