
विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा करण्यात येत होता. परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत जनतेने भाजपला साफ नाकारत महाविकास आघाडीला कौल दिला आहे. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्याने पहिल्या चाचणीत महविकास आघाडी यशस्वी झाल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गृह राज्यमंत्री देसाई हे सरकोली येथे आले होते. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, सुधीर अभंगराव आदी उपस्थित होते.
गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार एका भक्कम विचाराने उभे आहे. समन्वयातून, एकमेकांच्या विचारांतून आणि सर्वांना बरोबर घेऊन या सरकारचे काम चाललेले आहे. या सरकारला किंचितही धोका नाही. त्यामुळे हे सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून पडणार असल्याची वल्गना भाजप करीत आहे. कोणी फुटून जाऊ नये म्हणून भाजपला केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीला मतदानयंत्र नव्हते. या निवडणुकीत मतदारांनी भाजपला साफ नाकारले आहे. या सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व लाभले असून, शरद पवार, सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन आहे. कोरोना आटोक्यात येत असताना विकासाचा गाडा गतिमान होऊन महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य होण्यासाठी आम्ही काम करीत असल्याचेही राज्यमंत्री देसाई म्हणाले.
चंद्रभागेतील वाळूचोरी रोखणार
n चंद्रभागा नदीपात्रात अवैधरीत्या वाळूउपसा सुरू आहे. या वाळूचोरीच्या व्यवसायात काही पोलीस कर्मचाऱयांचा सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. वाळूचोरी हा ‘महसूल’च्या अखत्यारीतला विषय आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बैठक घेऊन वाळूचोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करू. कारवाईसाठी महसूल विभागाला पोलीस प्रशासन सहकार्य करेल. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.





























































