सारेगम फेम शमिका भिडे व्यवसायिक रंगभूमीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

रत्नागिरीची सुकन्या, सारेगम फेम शमिका भिडे आता ‘चि.सौ.का.रंगभूमी’ या नाटकातून व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या नाटकात ती गायन आणि अभिनय सादर करणार आहे. सारेगम यामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली रत्नागिरीची सुकन्या शमिका भिडे व्यवसायिक रंगभूमीवर चमकणार आहे. यापुर्वी शमिकाने मेघदूत या व्यवसायिक नाटकात भूमिका साकारली होती. महाकवी कालिदास यांच्या मेघदूतचे मराठीत रुपांतर करुन प्रयोग करण्यात आले होते.

चि.सौ.का.रंगभूमी नाटकाची कथा वेगळी आहे. विवाहाची शुभ घटिका जवळ आली आहे. सनई चौघड्यांचे सूर घूमत आहेत. सर्व मंडळी ही स्थानापन्न झाली आहेत. पडद्यामागे वधू आणि वरपक्ष उभा आहे. मंगलाष्टकांच्या मंगल सुरांनी नाटक सुरू होते व पडदा बाजूला सरताच वधू – वर एकमेकांना वरमाला घालतात आणि सुरू होतो एक असामान्य , अद्वितीय संसार. असामान्य असा की इथे वर आहे ‘रसिकराज’ आणि वधू आहे साक्षात ‘रंगभूमी’. अद्वितीय असा की १८४३ पासून आजतागायक हा संसार ,कधी गहिवरत तर कधी धुसफुसत पण तरीही अखंडपणे सुरळीत सुरू आहे. कोणालाही हेवा वाटावा अशा या सुखी संसाराची ही मनोरंजक कहाणी या नाटकात आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संपदा जोगळेकर-कुलकर्णी करणार आहे. या नाटकात गायिका-अभिनेत्री अशा भूमिकेत शमिका भिडे दिसणार आहे.