औषधी काढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

ऋतुबदल झाला की, अनेक सांसर्गिक रोगांना उधाण येतं. त्यात कोरोनाची भर. हल्ली अनेक जण गरम पाणी, हळद घालून कोमट पाणी किंवा पारंपरिक काढे नियमित घेतात. अनेक रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणाऱया काढय़ाची चर्चा सध्या जोरात आहे. अनेक जण विविध प्रकारचे साहित्य घालून काढे बनवतात आणि त्याचे नियमित सेवन करतात.

पण आपण केलेला काढा आपल्या आरोग्याला योग्य आहे का आणि त्याचे किती प्रमाणात सेवन करायचे याची माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्याला घातक असतो. म्हणूनच प्रत्येकाने कोणताही काढा घेण्याआधी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आवश्यक तितक्याच प्रमाणात त्याचे सेवन करावे.

अनेक जण इम्युनिटी वाढवण्याच्या नावाखाली काढय़ांचा अतिरेक करताना दिसतात. काढय़ात हळद, काळी मिरी, अश्वगंधा, दालचिनी असे अनेक साहित्य असतं, पण या किंवा इतर कोणत्याही मसाल्याचा अतिरेक झाला तर तो शरीराला झेपत नाही. अनेकांना याबाबत माहिती पूर्ण नसल्यामुळे इतर आरोग्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याचबरोबर कोणत्याही काढय़ामुळे लगेच प्रतिकारक शक्ती वाढत नाही, तर ती कमवावी लागते आणि त्यासाठी रोजच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याची गरज असते.

म्हणूनच प्रत्येकाने कोणताही काढा घेण्याच्या आधी तो घ्यावा की नाही आणि किती प्रमाणात घ्यावा याची चौकशी वैद्यकीय तज्ञांकडून करून घ्यावी. विशेषतः ज्येष्ठांनी आणि इतर आजार असलेल्यांनी कोणताही काढा किंवा ऐकीव उपाय करण्याआधी तज्ञांकडून खात्री करून घ्यावी. यामुळे कोणतेही विपरीत परिणाम होणे टळेल आणि स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे सोपे जाईल.