
वर्ल्डकप संपल्यानंतर क्रीडाप्रेमींनी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची विक्रमी डील झाली आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने या कंपनीने ही ऐतिहासिक खरेदी केली आहे. या सौद्यानंतर राजस्थानला आयपीएल चषक जिंकून देणारा दिवंगत कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याचे कुटुंबही मालामाल झाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्म हा फक्त क्रिकेटच्या मैदानातील मास्टरमाइंड नव्हता, तर मैदानाबाहेरही दूरदृष्टी असलेला खेळाडू होता. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीची डील झाल्यानंतर याचा प्रत्यय आला आहे. राजस्थान रॉयल्सच्या डीलनंतर दिवंगत शेन वॉर्न याच्या कुटुंबाला तब्बल 450 ते 460 कोटी रुपये मिळणार आहेत. 18 वर्षांपूर्वी वॉर्नने फ्रेंचायझीसमोर ठेवलेल्या एका अटीमुळे हे शक्य झाले आहे.
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. तेव्हा राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व शेन वॉर्नकडे होते. शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्ससाठी 4 हंगाम खेळण्यासाठी केवळ 9.35 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. राजस्थानशी करार करताना वॉर्नने चतूरपणे एक अट घातली होती. या अटीनुसार वॉर्नने संघासाठी खेळलेल्या प्रत्येक वर्षासाठी त्याला फ्रँचायझीमध्ये 0.75 टक्के भागीदारी मिळणार होती. वॉर्न राजस्थान रॉयल्ससाठी सलग 4 हंगाम खेळला. यामुळे त्याची एकूण हिस्सेदारी 3 टक्के झाली होती.
आता आयपीएलच्या 19व्या हंगामाआधी राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. 3 टक्के भागीदारीनुसार वॉर्नचा हिस्सा 450 ते 460 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यानंतर शेन वॉर्नचे कुटुंब आपला हा हिस्सा विकून पैसे मिळवू शकतो. मात्र, या व्यवहाराला बीसीसीआयची अधिकृत मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री
दरम्यान, शेन वॉर्न याच्या नेतृत्वाखालीच राजस्थान रॉयल्सने आपले पहिले आणि एकमेव आयपीएल विजेतेपद पटकावले होते. आता याच संघाचा विक्रमी करार झाला आहे. मात्र हे पाहण्यास शेन वॉर्न आपल्यात नाही. 2022 मध्ये त्याचे निधन झाले. मात्र मृत्यूपूर्वी त्याने 18 वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयाचा फायदा त्याच्या कुटुंबाला होत आहे.

























































