समाजात आजही मुलगी झाल्यावर नाराजी, शंकर महादेवन यांनी व्यक्त केली खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा महिलांच्या हातात नसलेल्या गोष्टींसाठी त्यांना जबाबदार धरून दोष दिला जातो. एवढेच नव्हे तर अजूनही आपल्या देशात मुलगी झाल्यावर नाराजी व्यक्त केली जाते, अशी खंत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.

सिंगापूरस्थित हिंदुस्थानी लेखिका माला महेश यांच्या ‘पद्मा’ पुस्तकाचे प्रकाशन वांद्रे येथे नुकतेच शंकर महादेवन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर त्यांनी ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील त्यांचे ‘माँ’ गीत सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

‘पद्मा’ पुस्तकात वंध्यत्व आणि स्त्रियांच्या संघर्षाची कथा आहे. पिढय़ान्पिढय़ा स्त्राrच्या जीवनाचे मूल्य तिच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेवर मोजले जाते. बाळंतपणात स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. क्वचितच गर्भधारणा, गर्भपात आणि वंध्यत्व याच्या आसपासच्या कथा आढळतात. लेखिका माला यांनी ‘पद्मा’ पुस्तकातून वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. ‘पद्मा’ पुस्तकात 100 वर्षांपूर्वीची केरळमधील एका छोटय़ा गावातील पद्मा आणि आजच्या काळातील नयना यांची गोष्ट आहे.

स्त्रियांना दोष देऊ नका

लेखिका माला महेश म्हणाल्या, माझ्या आजीने मला वंध्यत्वाच्या मुद्दय़ावर काही सत्य घटना सांगितल्या. अशा घटनांमध्ये पुरुषात समस्या असू शकते, परंतु हे सत्य स्वीकारले जात नाही. स्त्रियांना दोष देण्यात येतो. ही परिस्थिती स्त्राrची भावना, मानसिकता आणि कुटुंबावर कसा परिणाम करू शकते यावर आधारित ‘पद्मा’ ची कथा आहे.