।। श्री शंकरगाथा ।।

दावियले ‘श्रीगुरूंचे चरण’

कैलासाधिपती देव ‘शंकर’ प्रत्यक्षात श्रीशंकर महाराजांच्या रुपाने ‘मानव’देह धारण करुन पृथ्वीतलावर अवतरला ही सर्व शंकरभक्तांची धारणा आहे. प्रचीती व प्रत्यंतर लाभल्याशिवाय अशी धारणा कायम होत नाही या सत्यवचनानुसार श्रीमहाराजांच्या लीला भक्तांनी ऐकल्या, पाहिल्या आणि अनुभवल्या, म्हणूनच श्रीमहाराजांना लाभलेले ‘भूलोकावरील श्रीशंभुमहादेव’ हे संबोधन योग्य व यथार्थ ठरते.

श्रीमहाराजांची उंची बेताची होती. हात गुडघ्याच्या खाली येत असत. सदोदित बाल, उन्मत्त आणि पिशाच्च अशा अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करणाऱया श्रीमहाराजांना कळीकाळाचे भय अन् तमाही नव्हती. ते रात्री-बेरात्री मन चाहेल तिथे हिंडत, फिरत असत. स्वतःमध्येच मग्न राहिल्यामुळे अनेकदा त्यांचे देहभान हरपल्याचे पाहावयास मिळत असे. बाह्यरूपावरून ते वेडसर भासत असले तरीही अनेकदा अंतरीच्या ‘नाना’ कळा दाखवून ते भवतालच्या समुदायास चकितही करत असत. बेंगरूळ व अजागळ ध्यानामुळे अनेकांचा आपल्याविषयी गैरसमज निर्माण व्हावा असे खुद्द श्रीमहाराजांनाही अभिप्रेत असावे; कारण रेल्वे स्थानकावर गेल्यास त्यांचे ते वेंधळे आणि बावळे ध्यान पाहून एखादा हमाल त्यांना ‘दारुडा, पागल’ समजून हटकत असे. तर कधी, श्रीमहाराज स्वतःच एखाद्या हमालास गमतीत ‘मला उचल’ असे सांगत. अशा वेळी हमाल त्यांना उचलू जाता, ते स्वतःचा देह इतका जड करीत असत की, हमालाने कितीही प्रयत्न करावा तरीही त्याला श्रीमहाराजांना उचलणे तर दूर, जागेवरून हलविणेदेखील शक्य होत नसे. इथे त्यांच्या शक्तीसामर्थ्याची प्रचीती दिसून येत असे.

श्रीशंकर महाराजांचा उजवा पाय किंचित आखूड व लहान होता, तर डावा पाय मोठा होता. ‘उजवा पाय माझा असून डावा पाय श्रीगुरू स्वामीसमर्थ महाराजांचा आहे’ असे ते सहजभावाने सांगत असत. श्रीमहाराज जेव्हा आणि जिथे कुठे बसत असत तिथे त्यांचा उजवा पाय पुढे तर डावा पाय किंचितसा मागे असल्याचे त्यांच्या छायाचित्रातून दिसून येते. श्रीमहाराजांची ही नित्य बैठक सहजतेने घडून गेली होती. याद्वारे आपल्या भक्तांना श्रीगुरुचरणांचा स्पर्शही व्हावा अशी श्रीमहाराजांची धारणा असावी. श्रीमहाराजांच्या काही छायाचित्रांमध्ये त्यांच्या तर्जनीचा (अंगठय़ाच्या बाजूचे बोट) रोख डाव्या पावलाच्या दिशेने अर्थात श्रीगुरुचरणांपाशीच दिसून येतो. श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त अण्णा पानसरे यांच्यानुसार श्रीमहाराज, ‘माझे गुरू हेच केवळ आणि एकमेव सिद्धपुरुष आहे,’ असे श्रीस्वामीसमर्थांविषयी सांगत असत.

श्रीशंकर महाराज अनेकदा मान खाली घालून बसत असत. याविषयी एकदा एका भक्ताने विचारले असता श्रीमहाराज म्हणाले, ‘मला प्रत्यक्ष श्रीरामचंद्र समोर आहेत असे दिसते, म्हणून त्यांच्या चरणांवर माझी नजर खिळलेली असते.’ जणू श्रीरामभक्त हनुमान श्रीमहाराजांच्या रूपाने वावरत होता. श्रीमहाराज जेव्हा वीरासनात बसत असत तेव्हा त्यांच्या ठायी ‘भीमरूपी महारुद्र’ अशा हनुमंताचाच भास होत असे. श्रीरामरूपी स्वामीसमर्थ महाराजांसमोर श्रीमहाराजांच्या रूपाने जणू भक्तश्रेष्ठ हनुमंत बसलेला असावा! कदाचित हेच कारण असावे की, ज्यामुळे तत्कालीन भक्तमंडळींनी श्रीमहाराजांच्या समाधीस्थानाच्या समोर श्रीमारुतीरायाची स्थापना केलेली आहे.

दोन्ही पायांस लांबसडक हातांचा विळखा घालून विलक्षण सहजतेने बसलेल्या श्रीशंकर महाराजांचे मोठ्ठाले अन् टप्पोरे डोळे अतिशय भेदक होते. त्यांच्या तीक्ष्ण व धारदार नजरेमध्ये लखलखत्या हिऱयाचे चमकदार तेज होते. कधी श्रीमहाराजांच्या निरागस डोळय़ात अपार वात्सल्य दिसत असे, तर कधी वृत्तीचा क्षोभ झाल्यास त्यांच्या वटारलेल्या डोळय़ांमध्ये धगधगता अंगारदेखील पाहावयास मिळत असे. त्यांच्या दर्शनार्थ येणाऱया दुराचारी, दुष्ट व पापी मंडळींना श्रीमहाराजांच्या तेजाळलेल्या नजरेस ‘नजर’ भिडविण्याची हिंमत होत नसे.

श्रीमहाराज बाह्य आकारामध्ये कधी लहान, तर कधी मोठे दिसत असत. ते आपल्या शरीरात लीलानुरूप बदल करीत असत. कधी स्त्री वा पुरुष अशा स्वरूपात ते भक्तांना दर्शन घडवीत असत, याचे कारण श्रीमहाराजांसाठी प्रकृती व पुरुष यांत कसलाही भेद नव्हता.

चैतन्यस्वरूप (shree.chaitanyaswarup@gmail.com)