
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नगर तालुक्यावर विशेष लक्ष आहे. या तालुक्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून तालुक्याचा दुष्काळ हटविण्यात येणार आहे. भातोडी येथील तलावाचे हस्तांतरण करून त्याची दुरुस्ती करण्यात येणार असून तलावाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांना फायदा होणार असल्याचे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
‘गाव तेथे शिवसेनेची शाखा’ अभियानाअंतर्गत नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील गणातील निंबोडी, सारोळाबद्दी, टाकळी काझी, मदडगाव, सांडवा, कोल्हेवाडी, दशमी गव्हाण या गावांमधील शिवसेना शाखांच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, प्रवीण कोकाटे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, प्रवीण गोरे, शंकर ढगे, विलास शेडाळे, जीवाजी लगड, प्रकाश कुलट, बी. डी. कोतकर उपस्थित होते.
गडाख म्हणाले, शिवसेना शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. शिवसेना भक्कम करणार आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या व जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घेणार आहोत. नगर तालुक्यातील प्रत्येक गावात एका महिन्यात शाखा उद्घाटन करून गावाला भेटी देणार असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-2 अंतर्गत येणाऱ्या भातोडी तलावातून जाणाऱ्या कॅनॉलसाठी सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणासाठी निधी मिळावा. या तलावातून नगर तालुक्यातील सांडवा, मांडवा, उक्कडगाव, दशमीगव्हाण, मदडगाव या गावांकरिता भातोडी तलावातून कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात येते. या गावांत पाण्यासाठी टँकर सुरू होते. या कॅनॉलला सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण नसल्यामुळे लगतच्या शेतामध्ये पाण्याचा पाझर होऊन शेतजमिनी उफळल्या जाऊन नापिकी होतात. त्यासाठी कॅनॉलला सिमेंट काँक्रीटचे अस्तर असणे आवश्यक आहे. अस्तरीकरणाचे काम मंजूर करून राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना केली.
यावेळी अविनाश पवार, शहाजी आटोळे, अशोक ढगे, संतोष ढगे, गुलाब सय्यद, आकाश आठरे, प्रमोद काळे, नंदू आठरे, भरत शेडाळे, अक्षय सुंबे, संदीप खामकर, अशोक आवारे, प्रकाश बोरुडे, संजय ढगे, रमेश गव्हाणे, संतोष कुठे, सुरेश कराळे, संतोष काळे, अमोल खांदवे उपस्थित होते.





























































