
‘कृष्ण’मय असे योगिराणा
एकदा श्रीमहाराजांची कीर्ती ऐकून त्यांना भेटावयास एक विद्वान गृहस्थ आले. त्यांनी अनेक ग्रंथ व पुराणांचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यांचे चिंतन, मनन दांडगे असले तरीही प्रत्यक्ष प्रचीती व अनुभूती न लाभल्याने त्यांच्या मनातील रुखरुख कायम वाढतच राहिली. हे गृहस्थ जेव्हा श्रीमहाराजांकडे आले तेव्हा त्यांना अनेक वर्षे भेडसावत असलेली एक शंका त्यांनी श्रीमहाराजांना विचारली. ‘श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर भगवद्गीता कधी सांगितली? व युद्ध चालले असता श्रीकृष्णाला गीता सांगण्यास वेळ कसा मिळाला?’ त्या विद्वान गृहस्थाची ही शंका ऐकून श्रीमहाराजांनी त्यांना आपल्यापाशी बोलावले. ते गृहस्थ श्रीमहाराजांजवळ येऊन बसले अन् काही क्षणातच चटकन उठले आणि एकाएकी तिथून बाहेर निघून गेले. हा प्रसंग श्रीमहाराजांच्या ज्या भक्ताच्या घरी घडला त्याची आणि त्या विद्वान गृहस्थांची पुढे काही दिवसांनी अचानक भेट झाली तेव्हा त्या भक्ताने, विद्वान गृहस्थास श्रीमहाराजांसमोरुन एकाएकी निघून जाण्याचे कारण विचारले.
त्यावर त्या विद्वानांनी सांगितले, ‘अहो, श्रीमहाराजांनी मला जवळ बोलावल्यामुळे मी त्यांच्यापाशी जाऊन बसलो खरा मात्र त्याचवेळी मला श्रीमहाराजांच्या जागी श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडले आणि मला माझ्यामध्ये अर्जुनाचे रूप दिसू लागले. श्रीमहाराजांनी कुरुक्षेत्रावरील तो प्रसंगच तिथे साक्षात जिवंत केला. इथे मला मात्र श्रीमहाराजांनी घडविलेल्या भगवंत-दर्शनाचे तेज काही केल्या सहन होईना, म्हणून काहीच न सुचल्यामुळे मी गोंधळलेल्या अवस्थेत श्रीमहाराजांकडून उत्तर ऐकण्यापूर्वीच तिथून बाहेर निघून गेलो.’
श्रीमहाराज नेहमी सांगत, ‘नदीच्या पाण्याप्रमाणे वाहात राहा. नदी वाहू लागली की, तिच्या मार्गात येणाऱया अनेक प्रदेशांना ती सुपीक बनवत पुढे जात राहाते. तरीही आपल्या हातून घडणाऱया कार्याबद्दल तिच्या मनात अहंकार निर्माण होत नाही. उत्साहाने आणि आनंदाने पुढे पुढे वाहात जाणारी नदी अखेर समुद्राला मिळते. परंतु हे मीलनसौख्य घडल्यानंतरही ती शांत होत नाही, समाधानी राहात नाही तर पुनः पुन्हा असेच मीलन व्हावे या इच्छेतून तिचे रूपांतर वाफेत, त्यानंतर ढगात, पुढे पाण्यात आणि पुन्हा नदीमध्ये होते. मग हीच नदी पुन्हा सागराला मिळते. अशा रितीने मीलन-विरह-मीलन ही क्रिया जशी सतत चालू राहाते तसेच माणसानेही सातत्याने पुढे जात राहावे. आपण केलेल्या सेवेचा, कार्याचा अहंकार बाळगत तिथेच थांबून राहू नये. आपल्यापाशी येणारे प्रत्येक कार्य आनंदाने व उत्साहाने करावे. ज्याप्रमाणे नदी सागराकडे धाव घेत असते त्याप्रमाणे आपणही विराट व प्रेमस्वरूप अशा ‘दया’सागराकडे धाव घेतली पाहिजे.’
श्रीमहाराजांचे आचरण ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे होते. श्रीमहाराज अनेकदा व अनेक ठिकाणी भक्तांना परमार्थाची शिकवण देत असत आणि त्यांना शहाणेसुरते करून पुढे अन्य भक्तांना परमार्थाची शिकवण देण्यास निघून जात असत.
श्रीमहाराज भक्तांना नेहमी सांगत की, ‘बाह्य शंकराला भुलू नका. तुमच्यातील शंकराला ओळखा. त्याचा शोध घ्या म्हणजे तो निश्चित सापडेल. तो सापडला तर जीवन समाधानी होईल. इतर सर्व गोष्टी मिळूनही तुम्हाला तुमच्यातील शंकर मिळाला नाही तर काय उपयोग? आतल्या शंकराची ओळख झाली आणि बाहेरच्या काही गोष्टी जरी कमी मिळाल्या तरीही जीवन सर्वार्थाने सुखी होईल. तुमचे बाहेरचे रूप खरे नाही. तुमचे नावसुद्धा खोटे आहे कारण ते बालपणी ठेवलेले आहे. तुमचे रूपही खोटे आहे कारण ते क्षणोक्षणी बदलते म्हणून त्यावरही विश्वास ठेवू नका. आतले स्वरूप हे सत्य स्वरूप आहे. त्याचा शोध घ्या म्हणजे तुम्हांला शाश्वत जीवनाचा मार्ग निश्चितच सापडेल.’
एकदा गोकुळाष्टमीच्या औचित्याने साजऱया होणाऱया एका उत्सवामध्ये श्रीमहाराजांचे आगमन झाले आणि उपस्थित भक्तांना ते प्रसाद म्हणून लिमलेटच्या गोळ्या वाटू लागले. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले, मात्र तिथे उपस्थित असलेल्या निर्मला गुप्ते यांना त्या गोळीची चव सुंठवडय़ासारखी लागत होती. गुप्तेबाई श्रीकृष्णभक्त असल्याने हा ‘श्रीकृष्णाने दिलेला प्रसाद आहे’ अशी त्यांची भावना होती.




























































