चर्चा तर होणार… काकांच्या ’डीनर’ला पुतण्या नागपुरातून दिल्लीत, अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी आज डीनरचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरहून थेट दिल्ली गाठून या डीनरला उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही होते. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.

शरद पवार यांचा वाढदिवस शुक्रवारी मुंबईत साजरा केला जाणार आहे. त्याआधी दिल्लीत 6 जनपथवरील निवासस्थानी पवारांनी आज विशेष डीनर ठेवले. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, कमलनाथ, मनीष तिवारी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, भाजपचे बिप्लव देव तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी पवारांच्या निवासस्थानी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात अजित पवार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

पार्थही दिल्लीत

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार अडचणीत आले आहेत. आजच मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणात एफआयआरमध्ये पार्थ यांचे नाव का नाही, असे सरकारला विचारले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ हे सुद्धा सध्या दिल्लीतच असल्याचे कळते.