मेलेल्या आईचे दूध प्यालो नाही; ईडीला शरद पवार यांचे आव्हान

1407

सीबीआय, आयबी आणि ईडी या शासकीय यंत्रणा गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी निर्माण केल्या आहेत. या संस्थांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी भाजप या संस्थाचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेशी माझा कसलाही संबंध नाही, तरीही मला ईडीने नोटीस बजावली आहे. मी मेलेल्या आईचे दूध प्यालो नाही, तुमच्या ईडीला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आव्हान शरद पवार यांनी देत सरकारवर हल्ला चढवला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये झालेल्या सभेत पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. देशाचा इतिहास बदलला पाहिजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकांतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा काढून टाकला आहे, पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कोण होते त्यांचे शौर्य काय होते कसे कळणार, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य करणार, त्यांचे हे वक्तव्य विरोधाभासी असल्याचे ते म्हणाले. लेखणी हातात आली की, काही मंडळी मूळ इतिहास बदलून खोटा इतिहास लिहितील, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.

शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबत काही सुधारणा करणार असल्याचे वाचायला मिळाले, सहज चौकशी केली तर समजले, हे भाजपावाले महाराजांच्या किल्ल्यावर दारुचे अड्डे आणि छमछम सुरु करणार असल्याचे समजले. महाराजांचे गडकिल्ले महाराष्ट्राची शान आहे. स्वराज्याचा अभिमान आहे. त्या पवित्रस्थळाचे पावित्र्य घालवण्याचे उद्योग भाजपावले करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत या जातीयवादी सरकारला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहनही पवार यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या