
सामना ऑनलाईन । सांगली
जाहिरातींवर पैसा खर्च करायला आमच्याकडे पैसा नाही. उलट त्यांच्या तोंडून आमची प्रसिद्धी होत आहे हे चांगलेच आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तासगाव येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. शरद पवारांच्या घरात भांडणे होत असल्याचे नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये बोलत फिरत आहेत, तर कधी पुतण्याने पवारांचे अधिकार काढून घेतल्याचे म्हणत आहेत. अहो मोदी, आमची चिंता करू नका. हा काही एकटय़ादुकटय़ाचा पक्ष नाही. आमचा पक्ष जनतेच्या आशीर्वादाने सुरू आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
गेली पाच वर्षे ते सत्तेवर आहेत आणि शेतीसाठी काय केले हे आम्हाला विचारत आहेत. पण आम्ही विरोधी पक्षात आहोत हे लक्षात ठेवा अशी टीकाही पवार यांनी केली. सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारसभेत पवार बोलत होते. रावसाहेब दानवे यांच्या शेतकऱ्यांना साले संबोधण्याचाही पवार यांनी यावेळी समाचार घेतला. भाजपला सत्तेची इतकी मस्ती आहे की त्यांचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना साले म्हणत आहेत तर प्रवक्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणत आहेत आणि हेच त्यांच्याकडे मते मागायला जात आहेत. त्यांना मते मागायला जाताना लाज कशी वाटत नाही असा घणाघातही पवार यांनी यावेळी केला. दरम्यान, सांगली आणि स्वाभिमानी यांचे नाते अतूट असून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. हा वणवा पेटल्याशिवाय राहाणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.























































